Pune District : पुणे-सोलापूर महामार्गाचा दर्जा घसरला

सोरतापवाडी : पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या कामाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे, हडपसर ते उरुळी कांचन दरम्यानचा रस्ता तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रात असूनही या भागाकडे कोणीही लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
हडपसरचे आमदार चेतन तुपे, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांना या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. ही पालखी मार्गावरील प्रमुख वाट असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. मागील पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. हवेली तालुक्यातील हडपसर, शेवाळेवाडी, मांजरी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मुळ आणि उरुळी कांचन या गावांतून दररोज शेकडो विद्यार्थी व नोकरदारवर्ग पुणे शहरात ये-जा करतो. मात्र, खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.
शेवाळेवाडी येथील कुदळे कार ते लक्ष्मी कॉलनीपर्यंत सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा रस्ता 2024 साली डांबरीकरणाच्या नावाखाली दुरुस्त करण्यात आला होता. परंतु, काहीच दिवसांत या रस्त्यावर खड्डे पडू लागले. क्रशयुक्त डांबर उखडून गाड्यांना धक्का बसत आहे. पावसामुळे रस्त्याची चाळण झाली असून धुळीमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. या रस्त्याचे काम इतके निकृष्ट दर्जाचे झाले आहे की, नागरिक विचारू लागले आहेत की, हा रस्ता लोकांच्या सोयीसाठी केला की एखाद्याला खूश करण्यासाठी? अधिकार्यांचे म्हणणे आहे की, सतत वाहनांची वर्दळ असल्याने डांबर ’सेट’ होत नाही. परंतु हे उत्तर नागरिकांना समाधानकारक वाटत नाही.
टोलनाका बरा होता..
याशिवाय कुंजीरवाडी, नायगाव फाटा, मधुबन कार्यालय, लोणी स्टेशन, थेऊर फाटा व इतर ठिकाणी खड्डे पडले असून केलेली डागडुजी केवळ औपचारिक ठरली आहे. जुन्या रस्त्याची अवस्था तुलनेने चांगली होती, आणि टोलनाका सुरु असताना तरी किमान रस्त्याचा दर्जा टिकून होता, असे अनेक नागरिक म्हणत आहेत. आज मात्र ठेकेदारांची बेफिकिरी आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पुणे – सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तीनही आमदार सत्ताधारी गटाचे असुन त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्याची सध्याची स्थिती पाहता तो एखाद्या गावचा रस्ता असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तेच्या धुंदीत राज्यकर्त्यांचे त्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. तरी लवकरात लवकर या महामार्गाचे काम हडपसर ते उरुळी कांचन पर्यंत होणे गरजेचे असुन टोल द्यावा लागला तरी चालेल; परंतु महामार्गाची गुणवत्ता टिकणे फार गरजेचे आहे.
-स्वप्नील कुंजीर, शिवसेना ठाकरे गट संघटक





