Pune District : एमडी ड्रग्जची खबर देणाराचे सूत्रधार निघाला

शेलपिंपळगाव : पुण्यातील चाकणमध्ये एमडी ड्रग्जची विक्री खुलेआम सुरू आहे. हॉटेल ग्रँडसमोर एक स्कॉर्पिओ गाडीतून ही विक्री होत आहे, खबर पक्की आहे. विक्री करणार्याला सोडू नका, मॅनेज होऊ नका. आत्ताच धाड टाकलीत तर आरोपी जाळ्यात सापडेल, अशी खबर मिळताच चाकण पोलिसांनी सापळा रचून स्कॉर्पिओ मालकाला बेड्या ठोकल्या. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास केला अन् हा एक कटाचा भाग असल्याचे समोर आणले. धक्कादायक म्हणजे खबर देणाराच खरा सूत्रधार निघाला. जमीन व्यवहाराच्या वादातून स्कॉर्पिओ मालकाला गुन्ह्यात अडकविण्यासाठी रचलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला. चाकण पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय शिताफीने हा तपास केला.
जमिन प्लॉटिंगच्या व्यवहारातून तुषार कडचे निखील कड आणि राहुल टोपे यांच्याशी देवाण-घेवाणीवरून वाद झाले. मैत्रीत वितुष्ट आल्यानंतर काहीही करून तुषारला धडा शिकवायचा, असा निखील आणि राहुलने चंग बांधला. मात्र आपण काही कट रचतोय याची कल्पना तुषारला होता कामा नये, याची ही खबरदारी त्यांनी घेतली. मग मित्र हनिफ मुजावरला देखील सोबतीला घेतले, हनिफ ने पुण्यातील खबरी वसीम शेखच्या कानावर ही बाब टाकली. या चौघांच्या चर्चेत तुषारला एमडी ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याचा कट ठरला. त्यानुसार हनिफकडे 10 लाख रुपये देण्यात आले.
हनिफने एमडी ड्रग्ज उपलब्ध केले. एका सिल्व्हर कागदात आठ छोट्या पिशव्यांमध्ये हे एमडी ड्रग्ज होते. तुषारच्या गाडीची चावी निखीलकडे असायची, त्यामुळे ड्रग्जची पिशवी ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे ठेवण्यात त्यांना कोणती अडचण आली नाही. यानंतर वसीमने चाकण पोलिसांना खबर देण्याची भूमिका स्वीकारली. हॉटेल ग्रँडसमोर तुषार आणि निखील व्यवहाराबाबत चर्चा करत होते. निखीलने ते लोकेशन पोलिसांचा खबरी म्हणून काम करणार्या वसीमला दिले. वसीमने चाकण पोलिसांनी ते लोकेशन दिले अन् तिथे स्कॉर्पिओचा मालक खुलेआम एमडी ड्रग्जची विक्री करतोय, त्याला रंगेहाथ अटक करा, मॅनेज होऊ नका. असा मेसेज ही वसीम ने दिला.
पोलिसांनी ही तातडीने सापळा रचला अन् तुषारला बेड्या ठोकल्या. त्यावेळी तिथे उपस्थित असणार्या निखीलने माझा मित्र असे करुच शकत नाही, तुम्ही विनाकारण त्याला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेताय. असे म्हणत निखीलने तुषारची बाजू घेतली. पण एमडी ड्रग्ज गाडीत आढळल्याने चाकण पोलिसांनी तुषारला अटक केली. पण पुढील तपासात तुषारने वेळोवेळी हे नाकारले अन् मला यात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ठामपणे सांगितले. मग पोलिसांनी त्याचे क्राईम रेकॉर्ड तपासले असता त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र उलट फिरवली अन् अतिशय शिताफीने तपास करत या कटाचा पर्दाफाश केला. चाकण डीबी पथकाच्या या कामगिरीने तुषार कड लवकरच या प्रकरणातून निर्दोष मुक्त होणार आहे.
तिघांच्या मुसक्या आवळल्या
चाकण पोलिसांनी आत्तापर्यंत निखील कड, राहुल टोपे अन् वसीम शेखच्या मुसक्या आळवल्यात. तर हनिफ मुजावरचा शोध सुरुये. त्याच्या अटकेनंतर एमडी ड्रग्ज कोठून उपलब्ध केले हे सुद्धा निष्पन्न होणार आहे, असे पिंपरी-चिंचड पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी नमूद केले.





