Pune District : शिरूरच्या बेटभागाला चांगलेच झोडपले

जांबूत : प्रचंड उन्हाचा तडाखा आणि आकाशात दाटून आलेले काळे ढग, कडक उन्हाचा चटका आणि वातावरणात वाढलेल्या उकाड्यानंतर शुक्रवारी (दि.१६) दुपारी तीन वाजता ढगांच्या गडगडाटासह पूर्व मान्सून पावसाने शिरूरच्या बेटभागाला चांगलेच झोडपले. पहिल्याच दमदार पावसाने पाणीटंचाईशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण असून वरूणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यातील कडक तापमानाने भूगर्भातील पाणी पातळीत लक्षणीय घट होऊन गेले महिन्यापासून पिकांच्या पाणीटंचाईचा सामना शेतकरी करत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. तासभर पडलेल्या पावसाने काठापूर, पिंपरखेड, जांबूत या गावांना चांगलेच झोडपून काढले. पाऊस पडलेल्या परिसरातील सर्वच शेतात तसेच पिकांमध्ये पाणी साचले होते.
जोरदार पडलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेताचे बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तीन वाजता सुरू झालेल्या पावसाने तासभर जोरदार हजेरी लावल्यावर अधूनमधून विश्रांती घेत पाच वाजेपर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस सुरूच होता. चांडोह, फाकटे, वडनेर येथेही पाऊस पडला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
मान्सूनच्या आगमनाला काही कालावधी असताना पडलेल्या पूर्व मान्सून पावसाने बळीराजा सुखावला असून पाणी टंचाईच्या संकटात सापडलेल्या पिकांना फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





