Pune District : दुष्काळी अणे पठार आता पाणीदार

10 सिमेंट, 2 गाबियन बंधारे, 15 नाला, तलावाचे खोलीकरण पूर्ण
रामदास सांगळे
बेल्हे- गेले वर्षभरापासून वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) संस्थेमार्फत अणे पठार भागातील अणे, आनंदवाडी, पेमदरा, नळावणे,शिंदेवाडी गावाची डच बँकेच्या अर्थसहायातून जलसंसाधन विकास व व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंतर्गत निवड करण्यात आली असून त्या अंतर्गत ही गावे पाणीदार होत आहेत.
गेल्या वर्षभरापासून वॉटर संस्थेने अणे पठार भागावर काम करत असताना जलसंधारणाच्या दृष्टीने एक ठोस पाऊल उचलत आतापर्यंत 10 सिमेंट बंधारे 2 गाबियन बंधारे, 15 नाला, तलाव खोलीकरणाची कामे केली आहे. ही कामे करत असताना शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 100 शेतकरी बांधवांना गांडुळखत बेड वाटप, 30 शेतकरी बांधवांना सेंद्रिय द्रावण बनविण्यासाठी बॅरल, चिकट सापळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन वापरणार्या 50 लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान अशी जवळपास एक ते दीड कोटी रुपयांची कामे अणे पठार भागावर झाली असून सद्यःस्थितीमध्ये देखील संस्थेच्या वतीने पठार भागावर विविध जलसंधारणाची कामे सुरू आहे.
आनंदवाडी येथे वॉटर संस्था व यमाईमाता शेतकरी गटाच्या माध्यमातून सामूहिक गांडूळखत निर्मिती प्रकल्प तसेच अणे येथे सामूहिकटेन ड्रम थिअरी तंत्रज्ञान प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या कामांच्या माध्यमातून दुष्काळी अणे पठार भागावरील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली असून त्याचा प्रत्यय या वर्षातील उन्हाळ्यात एप्रिल महिन्यापर्यंत अणे येथील बंधार्यांमध्ये साठलेल्या पाण्याच्या माध्यमातून दिसून आला. भविष्याचा वेध घेऊन दुष्काळी अणे पठार भागावर वॉटर संस्थेने आगामी 5 वर्षाचा जलसंधारणाचा आराखडा तयार करून शाश्वत काम केले तर कायमस्वरूपी दुष्काळी समजला जाणारा पठार बाग हा पाणीदार,बागायती पठार भाग ओळखला जाईल अशी अपेक्षा पठारावरील शेतकर्यांनी केली आहे.
प्रकल्प लोकसहभागावर…
हा प्रकल्प लोकसहभागावर आधारित आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने जलसंधारणाची कामे केली जातात. यामध्ये सिमेंट बंधार्याचे बांधकाम करणे, जुन्या बंधार्याची दुरुस्ती करणे, जुन्या बंधार्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, जाळी बंधारे, कोरवाल बंधारे तसेच लाभार्थी गटाची स्थापना करणे, सूक्ष्म व तुषार पद्धतीचा अवलंब करणे, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन आदी उपक्रम संस्थेमार्फत प्रकल्पामध्ये राबवण्यात येत आहेत.
माझ्या शेतातील गट क्र.672मध्ये वॉटर संस्थेच्या माध्यमातून गेल्यावर्षी जो सिमेंट बंधारा निर्माण झाला. चालू वर्षी झालेल्या पावसाने हा बंधारा पूर्णपणे भरला गेला आहे. या बंधार्याने परिसरातील अनेक विहिरी तसेच बोअरवेल याची पाणी पातळी वाढली असून यावर्षी हा पाणीसाठा एप्रिल मे पर्यंत राहील अशी अपेक्षा आहे.
– शरद दाते, शेतकरी आणे
वॉटर संस्थेच्या सहकार्याने आगामी 5 वर्षात दुष्काळी पठार भाग पाणीदार करत असताना शेतकरी वर्गाला सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणार.
– माऊली संभेराव, स्थानिक शेतकरी
अणे पठार दुष्काळग्रस्त असून आमच्या पठारावरील पाणी आमच्याच शेतकर्याला वापरता येण्यासाठी वॉटर शेडमार्फत ग्रामपंचायतने सर्व्हे केला. त्यानुसार पठारावर अनेक बंधारे झाले आहेत. जवळपास दीड कोटी रुपयांची कामे अणे पठार भागावर झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. पठारावरील शेतकर्यांना पाणीदार करण्याचा आमचा संकल्प वॉटर शेडच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.
– प्रियांका दाते, सरपंच अणे





