पुणे जिल्हा : पूर्ववेशीची डिझाइन ग्रामस्थांकडूनच फायनल

संतोषनाना खैरे : नारायणगावच्या विकासासाठी प्रयत्नशील
नारायणगाव – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ववेशीला किती खर्च आला ते आम्ही सांगायला तयार आहोत. कारण संपूर्ण गावाचा सहभाग असून पूर्ववेस नारायणगावची अस्मिता असल्याने आम्ही राजकारण करणार नाही. पूर्ववेशीची डिझाईन सर्व ग्रामस्थांना दाखवून अंतिम केली असल्याचे श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलचे प्रमुख संतोषनाना खैरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
यावेळी माजी सरपंच योगेश पाटे, सुरज वाजगे, विकास तोडकरी, राजेंद्र पाटे, संजय खैरे, प्रल्हाद पाटे आदी मान्यवर उपस्थित होते. खैरे म्हणाले की, नारायणगावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून वैयक्तिक टीका करणार नाही. नारायणगाव येथील शवदाहिनी उभारताना ब्राह्मणसंघ साक्षीदार आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी कामे केली नसून गावासाठी केली. काम करताना कोणालाही दुखावले नाही.
खैरे म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या विकासासाठी मतदार आम्हालाच मतदान करणार असून आमचा सरपंचपदाचा उमेदवार तीन हजार मतांनी निवडून येणार आहे. तसेच यादीत कुकरचे चिन्ह नसताना विरोधी गटाला कसे दिले? यावरून दहशत कोणाची आहे हे कळते. प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून निवडणूक जिंकणार का असा प्रश्न विचारला. वेशीवरील प्रतिष्ठानचे नाव विकासाचा मुद्दा नसून ते काढून घेता येईल.
आमदार-खासदारांनी काय केले?
आमदारांनी ग्रामदैवत मुक्ताई देवस्थानला किती फंड दिला ते सांगावे. देवस्थानची कामे 2018 साली मंजूर झालेली असून त्यावेळी सध्याचे आमदार नव्हते. घनकचरा प्रकल्पाचा पाच कोटीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिलेला असून लोकप्रतिनिधींनी तो मंजूर करून आणावा. आमदार-खासदारांनी नारायणगावच्या विकासासाठी काय कामे केली ते जनतेला सांगावे. आम्हाला सार्वजनिक पार्किंग, आठवडे बाजार, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य यांच्यासाठी विकासाची कामे करायची आहे.





