पुणे जिल्हा : विधानसभेच्या प्रचारात भावी झेडपी सदस्यांची कसोटी

* पंचायत समितीच्या आखाड्यात इच्छुकांची लगबग
* सर्वाधिक मताधिक्य कोण देणार : तालुक्याचे लक्ष
सोमेश्वरनगर – लोकसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आमदारांची परीक्षा घेतली. जो विद्यमान व भावी आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळवून देईल, अशांनाच उमेदवारी मिळेल, अशी अट घातल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांनी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. संघटन उभे करून गावोगावी व प्रत्येक गल्लोगल्ली फिरून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. आता असेच चित्र पुन्हा विधानसभेत देखील दिसू लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी विद्यमान व इच्छुक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची परीक्षा घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम भागात कोणत्या गण व गटातून किती व कशा पद्धतीने किती लीडमिळेल. यावर इच्छुकांची उमेदवारी ठरेल व त्यांची ताकद देखील दिसून येईल. त्यामुळे इच्छुकांनी चांगलीच कंबर कसली होती.
बारामती तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे बारामतीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवार आपल्या गटात लीड देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विधानसभेचा प्रचार जोरात सुरु असून जे कधी कोणाच्या सुख-दुःखात किंवा साधी भेट देखील घेत नाही किंवा कधी कोणाचा फोन घेत नाहीत, असे पदाधिकारी मतदार राजांच्या दारोदारी फिरून संवाद साधला आहे.
इच्छुकांची संख्या सर्वाधिक
अडीच ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवट हटवल्यानंतर अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होणार आहेत. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनेही सर्व निवडणुका लढण्याचे संकेत दिल्यानंतर त्यांच्या गटातूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्याच दोन गटांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच नगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याने इच्छुकांनी विधानसभेत जोरदार प्रचार सुरू केला आहे. आपली दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.





