Pune District : रासकर मळा शाळेत टेम्पो शिरला

सासवड : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खळद (ता.पुरंदर)येथील रासकरमळा वस्तीवरती असणार्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला मंगळवारी (दि. 20) पहाटे आयशर टेम्पोची जोरदार धडक बसत अपघात झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे मोठे नुकसान झाले असून इमारत पुर्णपणे निकामी झाली आहे. सुदैवाने शाळेला सुट्टी व पहाटेची वेळ असल्याने अपघात यामुळे मोठा अनर्थ टळला.
रस्ता रुंदीकरणामध्ये हा रस्ता पूर्णपणे शाळेच्या जवळून अगदी संरक्षक भिंतीला लागूनच जात आहे. तर संरक्षक भिंतीचे कामही अर्धवट आहे. येथे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आला; मात्र याच्या बदल्यामध्ये काही तांत्रिक अडचण सांगत जागेचा अथवा इमारतीचा अद्यापपर्यंत एक रुपयाचा मोबदलाही देण्यात आलेला नाही.
याबाबत ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार अथवा प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे मोबदला मिळाला तर संरक्षक भिंतीचे काम करता येऊ शकते ही बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या वतीने याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. महिन्यापूर्वीही अशाच प्रकारचा अपघात होऊन कार येथील शाळेलगत असणार्या अंगणवाडीच्या संरक्षक भिंतीला धडकली होती.
त्यावेळीही भिंतीचे मोठे नुकसान झाले होते असे असतानाही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही याबाबत पालक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सरपंच संदीप यादव, तलाठी सतीश उमाप, ग्रामसेवक महेंद्र लोणकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका निलम वाघ, आबासाहेब खवले, सुरेश रासकर, योगेश कामथे, गोरख कादबाने, कैलास खळदकर, शिवाजी कामथे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
शाळेच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या वतीने शौचालय त्याचप्रमाणे,दोन दिवसापूर्वीच सुमारे 70 ते 80 हजार रुपये खर्च करून शाळेची रंगरंगोटी करत मुलांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती, अशातच ही घटना घडल्याने संपूर्ण इमारत निकामी झाली व मुलांच्या स्वागताऐवजी आता ही शाळा कोठे भरवायची व इमारत कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– संदीप यादव, सरपंच ग्रामपंचायत, खळद





