Pune District : शिक्षक दाम्पत्याची सिद्धी राज्यात प्रथम

बारामती : बारामतीतील शिक्षक दाम्पत्याची मुलगी सिद्धी बढे हिने नीटच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला. देशात ती मुलींमध्ये तिसरी आली तर देशातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये तिने २६ वा क्रमांक मिळविला आहे. तिला ७५० पैकी ६६५ गुण मिळाले आहेत. सक्सेस कोड अकॅडमीमध्ये नीटची तयारी करणाऱ्या सिद्धीवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
सिद्धी हिची आई सुरेखा बारामती नगरपरिषदेत शिक्षिका आहे तर वडील मुंजाबापू कुरकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सिद्धी दहावीपर्यंत बारामतीतील झैनबिया इंग्लिश स्कुलमध्ये तर अकरावी बारावीत दत्तकला कनिष्ठ महाविद्यालयात शिकली. बारावीला तिला ८९ टक्के गुण मिळाले आहेत. सिद्धीने नीट परीक्षेची तयारी बारामतीतील सक्सेस कोड अकॅडमीमध्ये केली.
दोन वर्षामध्ये तिने एकही वर्ग किंवा चाचणी परीक्षा चुकविली नाही. इतकेच नाही तर नीटची परीक्षा दिल्यानंतरही ती वैद्यकीय क्षेत्रातील विषयांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत येत होती, असे सक्सेस कोड ॲकॅडमीचे संचालक ए. पी. भुजबळ तसेच डॉ. येळे यांनी सांगितले. सिद्धीचे हे यश बारामती आणि राज्यासाठी प्रेरणा देणारे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यश साकार झाले
परीक्षेसाठी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १ लाख २५ हजार ७५७ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थी आहेत. यावर्षी नीटची परीक्षा दरवर्षीपेक्षा अवघड असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कामगिरीसाठी सिद्धीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिल्ली एम्समध्ये प्रवेश मिळविण्याचे सिद्धीचे स्वप्न आहे. यशामुळे ते साकार झाल्याचे तिची आई सुरेखा बढे यांनी सांगितले.





