शिरूर : शिरूर नगर परिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या नियमानुसार, मालमत्ता कर व पाणीपट्टी दरवर्षी दि. १ एप्रिल रोजी भरावा लागतो. पहिल्या सहा महिन्यांच्या आत कर भरणे बंधनकारक आहे, अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १५० अ (१) नुसार थकबाकीदारांवर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जाते. (दि.२५) मार्च रोजी नगर परिषदेच्या पथकाने मटण मार्केटमधील एका गाळ्याला सीलबंद करण्याची कारवाई मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यावेळी अक्षय बनगीनवार, दीपक कोल्हे, मोहन गुरव, तेजस शिंदे, अमृत भवर, भगवान आगोणे, कर्मचारी उपस्थित होते. थकीत पाणीपट्टीमुळे आतापर्यंत ६८ नळजोडण्या खंडित केल्या आहेत. पुढील काळातही थकीत मालमत्तेची जप्ती तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू राहणार आहे. थकबाकीदारांची नावे मुख्य चौकात प्रदर्शित करण्याचा इशारा नगरपरिषदेकडून नागरिकांना वेळोवेळी कर भरण्यासाठी मोबाइल संदेश पाठवले. डिसेंबर २०२४ पासून शहरात १० घंटा गाडीच्या माध्यमातून दवंडीही दिली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी (शनिवार, रविवार) देखील नवीन प्रशासकीय इमारतीतील नागरी सुविधा केंद्र तसेच जुन्या नगर परिषद कार्यालयात अतिरिक्त वसुली केंद्र सुरू ठेवले आहे. नागरिकांना घरबसल्या “Shirurnp.org” या संकेतस्थळावरून ऑनलाईन कर भरण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. थकीत कर न भरणाऱ्या मिळकत धारकांची नावे शहरातील मुख्य चौकात फलकांवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्वरित कर भरावा. – प्रितम पाटील, मुख्याधिकारी, शिरूर.