Pune District : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा निरर्थक – छगन भुजबळ

स्वागतासाठी इंदापुरात कार्यकर्त्यांची गर्दी
इंदापूर – दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील याबद्दल, कोणतीही चर्चा नाही. मला याबद्दल काही माहिती नाही; मात्र मीडियाला अधिक माहिती कुठून मिळते. असे स्पष्ट करत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या राज्यभर चाललेल्या चर्चेला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मोठा पूर्णविराम दिला आहे.
इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामधाम येथे, गुरुवारी (दि. 24) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सोलापूर जिल्ह्यातील दौर्यावर जाताना थांबले. इंदापूर तालुका व परिसरातील असंख्य कार्यकर्ते यांनी मंत्री भुजबळ यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी कर्त्यांसमवेत भुजबळ यांनी चर्चा केली. यावेळी अॅड. कृष्णाजी यादव, अतुल झगडे, पांडुरंग शिंदे, दत्तात्रय शेंडे, माऊली बनकर, अनिल राऊत, गणेश अण्णा झगडे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, जे कर्जमाफी संदर्भात आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी संदर्भात सकारात्मक शब्द दिला आहे. योग्य वेळी कर्जमाफी शेतकर्यांना देण्यात येईल असे सरकारचे धोरण आहे मात्र काही लोकांना, तात्काळ कर्जमाफी पाहिजे. योग्य वेळीच कर्जमाफी केली जाईल.
स्वस्त धान्य दुकानाच्या अनेक लहान-मोठ्या अडचणी आमच्या खात्यासमोर येत आहेत. यामध्ये मार्ग काढला जाईल अडचणी सोडवल्या जातील. गरज पडली तर ठोस कारवाई देखील केली जाईल. अशी ही माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा प्रश्नावर भुजबळ म्हणाले, कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर मी काही जास्त बोलणार नाही. विरोधी पक्ष पुन्हा याचे भांडवल करेल, असे म्हणत मंत्री भुजबळ यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्या संदर्भात बोलण्यात टाळले.
चांगले काम करणार्यांना पवार साहेब शाबासकी देतात
कोणत्याही पक्षात काम करणारा नेता असो, अथवा कार्यकर्ता, त्याने चांगले काम केले की ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब शाबासकी देतात. तो त्यांना अधिकारच आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चांगले काम असल्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक पवार साहेब यांनी केले आहे. हे योग्यच आहे. असे भुजबळ म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाची कानउघाडणी
अन्नपुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ विश्राम धाम येथे दाखल होताच. कार्यकर्त्यांनी सन्मानास सुरुवात केली. मात्र वीज वितरण कंपनीची वीज सातत्याने ये जा करत होती. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना एकतर वीजपुरवठा बंद करा, नाहीतर चालू ठेवा असे म्हणत, चांगलीच कान उघाडणी केली.





