पुणे जिल्हा: पक्षप्रवेशामुळे दौंडमध्ये सस्पेन्स; राहुल कुल- रमेश थोरातांसाठी अस्तित्वाची लढाई

राहू (भाऊ ठाकूर)- विधानसभेची वेळ जसजशी जवळ येईल तसतसे दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अर्ज माघारी घेतल्यानंतर जरी चित्र स्पष्ट होणार असले तरी खरी लढत ही कमळ व तुतारी फुंकणारा माणूस याच चिन्हावर होणार आहे. त्यामध्ये कमळ चिन्हावर राहुल कुल व तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर रमेश थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
परंतु अर्ज भरल्यानंतर व अर्ज भरण्याच्या अगोदर देखील दोन्ही नेत्यांनी आपआपली ताकद वाढविण्यास सुरवात केली आहे. दोन्ही उमेदवारांची स्वतःची एक गठ्ठा मते आहेत. परंतु दोन्ही गटातील पक्ष प्रवेशामुळे कोणाची ताकत वाढत आहे, कोणाची कमी होत आहे. याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे.
गेल्या अडीच वर्षांत राज्यातील पक्षांच्या फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक भावनिकतेकडे वळल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शरद पवार गटाला राज्यात मोठी सहानुभूती मिळाली. त्याचा परिणाम हा प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर तसेच दौंड विधानसभा मतदारसंघात देखील होत आहे. दौंडमध्ये रमेश थोरात यांनी तुतारी हाती घेतली आहे तर राहुल कुल हे कमल चिन्हावर लढत आहेत. यामध्ये रमेश थोरात यांना तुतारी या चिन्हाचा सहानभुतीचा फायदा होऊ शकतो.
तसेच आमदार असताना व बँकेच्या माध्यमातून केलेली कामे, तसेच त्यांचा तळागाळातील लोकांशी संपर्क ही देखील जमेची बाजू आहे. राहुल कुल हे सत्तेत असल्यामुळे कोट्यवधीची रुपयांच्या केलेल्या विकासकामाचा कागद घेऊन मतदारांपुढे जात आहेत. परंतु हे होत असताना दोन्ही गटातील शेकडो कार्यकर्ते हे या गटातून त्या गटात प्रवेश करीत असल्याचे वृत्त दौंडच्या कानाकोपऱ्यात जात आहे. त्यामुळे सर्वत्र संभ्रमावस्था दिसून येत आहे.
राहू बेट हे आमदारांचे वर्चस्व असणारा भाग आहे. त्यातच बेट परिसरात आमदार गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्यामुळे राहू बेटाकडून आमदार गटाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याला प्रतित्युतर म्हणून दौंड तालुक्यातील अनेक गावांतून व काही ठिकाणी बेट परिसरातून देखील रमेश थोरात यांच्या गटात देखील मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले आहेत.
प्रवेश ही फक्त निवडणुकीपुरती सूज
दोन्ही गटांत मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले असले तरी हे प्रवेश हे एक प्रकारची सूज मानली जाते. कारण गावपातळीवर झालेले प्रवेश हे गावपातळीवरील अडी अडचणी, भावकी- भावकीतील भांडणे किंवा बांधावरील भांडणे, गावपातळीवर असणारा विरोधक या पक्षात आहे. मग आपण त्याच्या विरोधी पक्षाचे काम करायचे, असे गणित हे मोठ्या प्रमाणावर प्रवेशामागे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा शंभर टक्के मतात परिवर्तित होईलच, असे नाही.
तुषार थोरात सक्रिय
आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुका या रमेश थोरात यांनी स्वतः व कार्यकर्त्यांना घेऊन नियोजन करून लढविल्या आहेत. त्यात अनेकवेळा यश देखील आले. परंतु आता रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याने मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्यांच्या मागे उभा असलेला दिसून येत आहे. तुषार थोरात हे उच्चशिक्षित असून निवडणुकीत संघटण बांधणीसाठी त्यांचा निश्चित फायदा होत असल्याचे बोलले जात आहे.





