पुणे जिल्हा : लाला बँकेवरील सुपरवायझरी निर्बंध उठविले

अध्यक्ष युवराज बाणखेले : मार्च 2023 पासून बँकेचा शून्य टक्के एनपीए
नारायणगाव – पुणे जिल्ह्यातील लाला अर्बन बँकेची आर्थिक परिस्थिती व समाधानकारक कामकाज असल्याने बँकेवरील सर्व सुपरवायझरी निर्बंध बंधने मागे घेत असल्याचे शुक्रवारी (दि. 2) रिझर्व बँकेने पत्रान्वये कळविण्यात आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी दिली.
एनपीएचे प्रमाण नियमापेक्षा जास्त असल्याने रिझर्व बँकेने 2019 पासून लाला बँकेवर सुपरवायझरी निर्बंध टाकण्यात आली होती. बँकेवरील बंधनामुळे सभासदांना रिझर्व बँकेच्या परवानगीशिवाय लाभांश जाहीर करणे, कार्यक्षेत्र विस्तार व शाखा विस्तार करता येत नव्हता; परंतु मार्च 2023 अखेरीस लाला अर्बन बँकेची रिझर्व बँकेकडून तपासणी पूर्ण होऊन लाला बँकेस तपासणी अहवाल सादर करण्यात आला.
या अहवालात सर्व बंधने मागे घेत असल्याचे कळविले आहे. मार्च 2023 पासून आजतागायत बँक शून्य टक्के एनपीए ठेवण्यात यशस्वी झाली असल्याने रिझर्व बँकेकडून लाला अर्बन बँकेस मोबाइल बँकिंगचा परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देता येणार असल्याचे बाणखेले म्हणाले. बँकेकडून चांगले काम होत असल्याने संचालक मंडळाने बँकेचे कर्मचारी व अधिकार्यांचे अभिनंदन केले असून सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
लाला अर्बन बँकेची ओतूर शाखा 29 जानेवारी 2024 रोजी एटीएमसह सुरू करण्यात आली असून ग्राहकांनी बँकिंग सेवेचा लाभ घ्यावा. तसेच बँकेच्या चाकण शाखेचे महामार्गावरील आंबेठाण चौकातील प्रशस्त जागेत स्थलांतर होणार आहे.
– जितेंद्र गुंजाळ, उपाध्यक्ष
आर्थिक परिस्थिती
ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, एनपीए शुन्य टक्के, रेटिंग सिस्टीम पद्धतीने केलेल्या कर्ज वितरणामधील सर्व कर्जखाते स्टॅडर कॅटेगरीमध्ये आहे, अशी माहिती कार्यकारि अधिकारी डी. एन. सुरम यांनी सांगितले.
कर्जवाटप मर्यादेत वाढ होणार
बँकेचे सुपरवायझरी निर्बंध उठल्यामुळे बँकेच्या कर्जवाटप मर्यादेत वाढ होत असून वैयक्तिक कर्ज मर्यादा 4 कोटी 50 लाख तर समूह कर्ज मर्यादा 7 कोटी 50 लाख इतकी होणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे यांनी सांगितले.





