पुणे जिल्हा : बारामतीतून सुनेत्रा पवार ; राजकीय हवा तापली

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
खासदार सुप्रिया सुळे या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, अशी अटीतटीची आणि लक्षवेधी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
बारामती मतदारसंघ हा परंपरागतपणे पवार घराण्याचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांचे 1967 पासून बारामतीवर एकहाती वर्चस्व आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी बारामतीचे लोकप्रतिनिधित्व केले आहे.
आता खासदार सुप्रिया सुळे या चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच नशिब अजमावत आहेत. त्यामुळे ही लढत शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे यापूर्वीच तापलेले बारामतीचे मैदान पुन्हा चांगलेच तापणार आहे.
शरद पवार यांच्या कुटुंबीयात प्रथमच फूट पडल्यानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठतेची झाली आहे. खासदार सुळे यांच्याबरोबर महाविकास आघाडी तर सुनेत्रा पवार यांच्याबरोबर भाजप, शिंदे गटाची रसद आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांचे बंड शमल्याने आता ही निवडणूक रंगतदार होणार आहे.





