पुणे जिल्हा: उजनीकाठावर ऊस जाळून तोडण्याचा सपाटा

पळसदेव – पळसदेव भागासह इंदापूर तालुक्यात अनेक भागात ऊस तोडून नेण्यासाठी प्रति एकर नुसार ऊस तोडणी कामगारांना पैसे देण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. तर ऊस वाहतूक करणार्या चालकाला दररोज भत्ता आसा दररोज हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सध्या शेतकर्यांवर आली आहे.
एवढे करूनही ऊस तोडणी कामगार सध्या ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा लावला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पोटच्या पोराप्रमाणे गत दीड वर्षे संभाळलेल्या उसाला डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात ऊस जाळून तोडला जात आहे, त्यामुळे जळीताचा ऊस गाळपाला गेल्यावर शेतकर्याचे प्रति टननुसार नुकसान होत आहे. सध्या रोगग्रस्त नसलेला देखील ऊस पेटवून तोडण्याचा सपाट उजनी काठावर सुरुच आहे, तरी याबाबत कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. उजनी भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
त्यात ऊसतोडणी कामगारांची संख्या कमी आहे. त्यामुळे शेतातील ऊस लवकर गाळपासाठी जावा अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ऊस घालवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. शेतकर्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेण्याचे काम ऊसतोडणी कामगार व ऊसवाहतूक करणारे मालक घेत आहेत. एकरी 5 हजार रुपयांपर्यंत ऊस गाळपासाठी नेण्यासाठी देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
अशीच पिळवणूक होत राहिल्यास…
शेतकर्यांची ऊस तोडणी कामगारांकडून सातत्याने ही पिळवणूक अशीच होत राहिल्यास येणार्या काळामध्ये ऊस पिकापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात परावृत्त होईल. तसेच उसावर राजकारण करणार्या नेते मंडळींना मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येणार्या काळात या भागातील उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तरी याबाबत कारखाना प्रशासनाने जातीने लक्ष घालून ऊस तोडण्यासाठी अतिरिक्त पैसे घेणार्या व रोगग्रस्त नसतानाही जाळून ऊस तोडणार्या कामगारांवर तातडीने कारवाई करून शेतकर्यांना दिलासा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.





