Pune District : बारा गुंठ्यात घेतले दुधी भोपळ्याचे यशस्वी उत्पादन

मंचर : अवसरी खुर्द विकासवस्ती ता. आंबेगाव येथील बाळासाहेब बाबुराव टेमकर यांनी त्यांच्या शेतातील बारा गुंठे क्षेत्रात दुधी भोपळ्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. त्यांचा भोपळा हा मॉलमध्ये विक्रीसाठी जात आहे.सद्यस्थितीत मिळणारा बाजारभाव पाहता दुधी भोपळ्यातून अंदाजे खर्ज वजा जाता १ लाख रुपयांचा नफा मिळतो, शेतकरी बाळासाहेब टेमकर यांनी त्यांच्या शेतात मांडव उभा करून दुधी भोपळा बियाण्याची लागवड केली आहे, दुधी भोपळ्यासाठी पाच ते सहा हजार रुपये मांडव आणि इतर खर्च झाला असून त्यानंतर खते,औषधे, खुरपणी करुन दुधी भोपळ्याचे उत्पादन चालू झाले आहे.
दुधी भोपळा पिकाची तोडणीला सुरुवात झाली असून दररोजच्या तोड्यातून त्यांना अडीच ते तीन हजार रुपये मिळत आहे. त्यांचा दुधी भोपळा हा मॉलला विक्रीसाठी जात असून सध्या १५ ते १७ रुपये नग, असा बाजार आहे. पुढील दोन महिने हे पीक चालू राहणार असून दुधी भोपळ्याला चांगला बाजार असल्याने बारा गुंठ्यातून सर्व खर्च वजा जाता लाखभर रुपये शिल्लक राहतील.असे टेमकर यांनी सांगितले.
दुधी भोपळा हे पीक खर्च कमी व उत्पादन जास्त देणारे पीक असून शेतकऱ्याने नियोजनबद्ध शेती केली तर यातून चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते. सुरुवातीला मांडव, खते, औषधे याचा खर्च करावा लागतो. पुन्हा जास्त खर्च येत नाही.माल चांगला आल्यास प्रतवारी करून तो मॉलला पाठवता येतो व किरकोळ माल हा बाजार समितीत देखील विक्रीसाठी पाठवता येतो. दुधी भोपळा हा आरोग्यासाठी चांगला असतो. दुधी भोपळा खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रणात राहते, दृष्टीसाठी देखील चांगला असतो. डायबिटीज आटोक्यात राहते. दुधी भोपळा विविध आजारांसाठी गुणकारी भाजी फळ असून शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पिक घेतल्यास त्यातून हमखास आर्थिक फायदा होतो.
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्र, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे.
– डॉ.हर्षद शेटे,हृदयरोग तज्ज्ञ,संजीवन हॉस्पिटल, मंचर.
स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.
– डॉ.विनायक खेडकर,विनायक हॉस्पिटल मंचर.





