Pune district : विद्यार्थ्यांची पायपीट संपणार, शिक्षणाला गती मिळणार

मोरोशी जिल्हा परिषद शाळेत ‘सायकल बँक’चा शुभारंभ
राजगुरुनगर – विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी करावी लागणारी रोजची पायपीट आता इतिहासजमा होणार आहे. ‘सायकल बँक’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ मोरोशी जिल्हा परिषद शाळेत झाला. शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी मर्सिडीज बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. व हॅण्ड इन हॅण्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मोरोशी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 36 विद्यार्थी, तर डेहणे येथील शिवाजी विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत 230 विद्यार्थी शिकत आहेत. बहुसंख्य विद्यार्थी कष्टकरी व आदिवासी कुटुंबातील असून, रोज 2 ते 5 किमी अंतर पायी पार करून शाळेत पोहोचतात. विद्यार्थ्यांच्या या कष्टप्रद प्रवासाची दखल घेत मोरोशी शाळेला 28 सायकली, तर डेहणे विद्यालयाला 35 सायकली वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होऊन शिक्षणातील सातत्य टिकवणे शक्य होणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
सायकल बँक – वापर नियम
प्रत्येक सायकलला नंबरिंग, ती शाळेची मालमत्ता
उन्हाळी व दिवाळी सुट्टीत सायकली शाळेत जमा करणे बंधनकारक
नव्याने दाखल विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध
सातवी पूर्ण (किंवा विद्यालयीन शिक्षण संपल्यावर) सायकल शाळेत जमा





