Pune District : उन्हाच्या झळांपासून प्राण्यांना वाचवण्याची धडपड

रांजणी : आंबेगाव तालुक्यात उन्हाच्या चटक्याने होरपळ वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. माणसांबरोबरच प्राण्यांचाही जीव कासाविस होत आहे. मेढी, बकऱ्या, गायी आणि म्हशी या पाळीव प्राण्यासाठी गोठ्यांना थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहेत.
ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविला जात आहे. गेल्या काही वर्षातील तुलनेत यंदा उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवत असून तालुक्याच्या पूर्व भागाची परिस्थिती पहिली तर उन्हाच्या चटक्यामुळे शेतकरी वर्ग देखील शेतात काम करण्यास धजावत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून तालुक्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान उन्हाच्या तडाक्यामुळे मेंढपाळ देखील आपली मेंढर सावलीचा आधार घेऊन मेंढ्यांना उन्हाच्या काहीलीमध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. उन्हामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले असून त्याचा विपरीत परिणाम पशु, पक्षी आणि वन्यजीवांवरही झाला असल्याचे पाहायला मिळते.
प्राण्यांना हिरवळीचा आधार…
दरम्यान तालुक्यात मागील आठवड्यात ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही नोंद गेल्या २५ ते ३० वर्षातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद असल्याचे दिसून आली. सध्या भीमाशंकर परिसरातही कडक उन्हाच्या लाटेमुळे वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आला असून उन्हाच्या चटक्याने पशुपक्षी आणि वन्यप्राणी हिरवळीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे.





