Pune District : अवसरी बुद्रुक गावात ओढे खोलीकरणाचे काम सुरू

अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाझर तलाव, बंधारे खोलीकरण व गाळ काढणे कामाला सुरुवात झाली आहे. तीन पोकलेन मशीनच्या सहाय्याने ८ किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण काम पूर्ण झाल्यानंतर ३५० ते ४०० एकर क्षेत्र बागायती होणार आहे. अवसरी हे गाव पाणीदार गाव होणार असल्याची माहिती सरपंच सारिका हिंगे यांनी दिली.
अवसरी बुद्रुक गावच्या सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, कल्याण हिंगे यांनी गेली सहा महिन्यापासून टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून अवसरी गावातील गावचा मुख्य ओढा, हिंगे वस्ती, शेटेमळा, गुनगे मळा, वरचा हिंगे मळा, भोकरशेत, चव्हाणमळा, चवरेमळा, येलभरमळा यांसह परिसरातील ओढ्यांचे खोलीकरण करण्याची मागणी केली होती.
या मागणीचा विचार करून टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन पोकलेन मशीनच्या सहाय्याने ओढा खोलीकरण कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्याण हिंगे पाटील, चंद्रकांत गुनगे, मनीषा हिंगे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे पाटील, सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर येलभर यांच्या हस्ते उद्घाटन करून ओढा खोलीकरण कामाला सुरुवात झाली.
उन्हाळ्याचे तीन महिन्यात शेतीच्या पाण्याची तीव्रता अधिक जाणवत होती. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर दोन दिवसापूर्वी टाटा मोटर्स फाउंडेशनच्या वतीने गावात तीन पोकलेन मशीन पाठवण्यात आले असून प्रत्यक्ष ओढे खोलीकरण कामाला सुरुवात झाली आहे.
खोलीकरणाचा चारशे एकरला लाभ…
या माध्यमातून आठ किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण होऊन डिंभे उजवा कालव्याचे पाणी ओढ्यात सोडल्यानंतर साडेतीनशे ते चारशे एकर क्षेत्राला लाभ होणार आहे. उन्हाळ्यात पाणी साचून जवळ पासच्या विहिरींची पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासही मदत होणार असल्याचे उपसरपंच अनिल हिंगे पाटील यांनी सांगितले.





