पुणे जिल्हा : हॉस्पिटलच्या मशीनसह रक्कम चोरीला

पिंपळे जगताप येथील घटना : साहित्यांची तोडफोड
शिक्रापूर – पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील माऊली हॉस्पिटलमधील रुग्ण तपासणी मशीन तसेच काही रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले. हॉस्पिटलमधील साहित्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळे जगताप येथे डॉ. स्वप्नील वारे यांचे माऊली हॉस्पिटल असून डॉ. स्वप्नील हे गावी गेल्याने त्यांचे वडील सुधाकर हॉस्पिटलची देखभाल करीत होते. दि. ११ रोजी सायंकाळी सुधाकर हे हॉस्पिटल बंद करून घरी गेले होते, दि. १२ रोजी सकाळी सुधाकर हे हॉस्पिटलकडे आले. त्यांना शटर उचकटलेले दिसल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये पाहणी केली.
हॉस्पिटलच्या फाईल अस्थाव्यस्त पडून साहित्यांचे नुकसान झाल्याचे दिसले. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता तीस हजार रुपये तसेच रुग्ण तपासणीची रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत सुधाकर यशवंत वारे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल आहे.





