नारायणगाव : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओझर चौकात छत्रपतींच्या मावळ्याचा पुतळा बसविण्यात आला.

शिवजयंतीच्या दिवशी हजारो शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असतात. हेच औचित्य साधून ओझर चौकात सेवेचे ठायी तत्पर-शिवरायांचा मावळा या उक्तीप्रमाणे मागील तीन वर्षापासून शिवभक्तांच्या प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा प्रतिकात्मक पुतळा बसविण्यात आला असून सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायणगावचे सहायक निरीक्षक महादेव शेलार, उपसरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, विकास तोडकरी, अजित वाजगे, ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, किरण ताजने, बाळा वाव्हळ, हेमंत कोल्हे, संतोष पाटे, जालिंदर खैरे, संतोष दांगट, ग्रामपंचायत सदस्य, शिवभक्त, राजे प्रतिष्ठानचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

सालाबाद प्रमाणे शिवजयंतीच्या एक दिवस अगोदर शिवनेरी किल्ल्यावर ज्योत आणण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक शिवभक्त येत असतात. अशा शिवभक्तांना ओझर फाटा येथे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार, चहा आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. प्रत्येक शिवभक्ताने आणलेल्या मशालीस पुष्पहार आणि तेलाची बाटली प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

गेली दहा वर्षापासून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सभासद नारायणगाव नगरीत येणार्या शिवभक्तांचे स्वागत व नाष्ट्याची सोय करून देण्याकरता शिवजयंतीच्या दिवशी पहाटे पर्यंत उपस्थित असतात. याशिवाय शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर सायकल रॅलीत 650 मुलांनी सहभाग घेतला होता. याच दिवशी तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगावात तमाशाच्या राहुट्यांचे उद्घाटन करण्यात आले.