Pune District : एसटी बस फुटपाथवरून उलटली, तीन विद्यार्थी जखमी

भाटघर – महुडे येथून भोरकडे येणारी एसटी बस प्रवाशांसह फुटपाथवरून घसरत गटारात उलटली. ही घटना बुधवारी (दि.९) दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान माळेवाडी गावच्या हद्दीत घडली. पावसामुळे हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या अपघातात ८ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी जखमी झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. एसटी बसमधून एकुण ९ जण प्रवाशी प्रवास करीत होते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महुडे – भोर एसटी बसमधून माळवाडीला जाण्यासाठी महुडे येथील शाळेतून सुटलेल्या १ अन्य प्रवाशीसह ८ विद्यार्थी प्रवास करीत होते. महूडे खुर्द आणि महूडे बुद्रुक यादरम्यान खुडेवस्ती जवळील विहिरीच्या चढावर अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना भोर आगाराची
(एमएच ०६, एस ८२८९) ही एसटी बस गटारात घसरून उलटली. यावेळी बसमधील ३ मुली जखमी झाल्या. त्यांच्यावर भोर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, इतर ५ मुली सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. मात्र, एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षीही पावसाळा सुरू झाल्यानंतर या अपघाताप्रमाणेच रस्ता अरुंद असल्याने एसटी बस उलटली होती. घटनास्थळी भोर एसटी आगाराचे अधिकारी तात्काळ पोहोचून पुढील कार्यवाही सुरू आहे.





