वाजवणे-औदर रस्ता की जलकुंभ? ः तीन तास प्रवासी ताटकळत राजगुरुनगर – वाजवणे-औदर रस्त्याची फारच दुरवस्था झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष बाब म्हणजे या रस्त्यावरून जाणारी एसटी बसची आठही चाके खड्यात रुतून बसली. त्यामुळे बर्याच वेळ नागरिकांची गैरसोय झाली. एसटी बसची चाके गेली कुठे? असे एसटी बसमधील प्रवासी व या रस्त्याने जाणार्या येणार्यांना प्रश्न पडला होता. वाजवणे औदर गावाला जोडणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहनांचा खुळखुळा होत आहे. तर वाहनातून प्रवास करणार्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खराब झाल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला जाण्या येण्यासाठी मोठी अडचण होत आहे. खासगी वाहने या रस्त्याने जास्त प्रमाणात जात नसल्याने सर्वांसाठी गैरसोयीचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची डागडोजी झाली नाही. पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. राजगुरुनगर आगारातील बस औदर कडे जात असताना वाजवणे गावच्या पुढे रस्त्यात पडलेल्या मोठ्या आणि खोल खड्ड्यात अडकून बसली. एसटीची आठही चाके या खोल खड्ड्यात अडकली. पुढे आणि मागे जाता येत नव्हते. रस्त्यावर पाणी आणि त्यात पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे ही घटना घडली. रस्त्यात मधोमध हा प्रकार घडल्याने दोन्ही बाजूकडून वाहतूक बंद झाली. जवळपास तीन तास बस अडकून पडल्याने प्रवासी नागरिक नोकरदार यांचे हाल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने खड्यात अडकलेली एसटी बस काढण्यासाठी जेसीबी आणला. त्यानंतर बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. खेड तालुक्यातील वाजवणे, औदर, कुडे, घोटवडी, देवाशी, येणिये या दुर्गम भागात प्रवासाचे एसटी बस ही मुख्य साधन आहे. मात्र या भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी दोन ते पाच फूट खोल खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवताना छोट्या मोठ्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागते तर एस टी बस आणि अवजड वाहनांना खड्ड्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाहनाचा आणि वाहनातून प्रवास करणार्या नागरिकांचा खिळखिळा बनला आहे. अवजड वाहतुकीन रस्ते खराब या भागात राजरोसपणे अवैध माती वाहतूक हायवा आणि ट्रकमधून केली जात होती. त्यामुळे या भागातील रस्त्यावर जड वाहतूक झाल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले त्यात आता पाऊस पडत असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने खड्याचे आकार आणि खोली अजूनच वाढली आहे. जड वाहनाची येजा होत असल्याने रस्त्याच्या दुरावस्थेला अवैध वाहतूक करणारी जड अवजड वाहने असल्याचे नागरिकांनी सांगितले.