पुणे जिल्हा : पोस्टाकडून राखीसाठी खास पाकीट

वाल्हे : रक्षाबंधन अगदी काही दिवसांवरच आले असून, त्यासाठी बहिणींकडून आपल्या भावाला राखी पाठविण्याची धडपड सर्वत्र सुरू झाली आहे. बहिणीच्या या प्रेमाचा मान राखत पोस्टाकडून राखीसाठी खास पाकीट तयार केले आहे.
एवढेच नव्हे तर मलाडक्या बहिणीफ ची राखी भावाला वेळेत मिळावी यासाठी, विशेष मोहीम राबविली जात आहे.यामुळे यंदा भावाला आपल्या लाडक्या बहिणीची राखी वेळेत मिळत आहे. सोमवार (दि .19) रक्षाबंधन आहे. या रक्षाबंधनाच्या पर्वावर बहीण गावखेड्यातून शहरी भागात आणि शहरातून दुसर्या शहरात अथवा गावी राखी पाठवितात. याकरिता पोस्ट विभागाने विशेष पाकीट तयार केले आहे. त्यावर राखीचे आकर्षक चित्र आणि राखीचा शुभ संदेश लिहिला आहे.
या पाकीटमध्ये 20 ग्रॅम वजनापर्यंतची राखी बसणार आहे. विशेष म्हणजे, राखीचे पाकीट पाठविण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था असणार आहे. बारामती विभागातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये हे राखी पॉकेट उपलब्ध आहे. कित्येकदा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाला बहिणीची राखी मिळते.
मात्र, यंदा ही चूक होऊ नये यासाठी पोस्ट विभागाने लगेच राखीचे पाकीट पोहच करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती वाल्हे (ता.पुरंदर) पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर रमेश पवार यांनी दिली.





