Pune District : सोपानकाका पालखीचे 23 जून रोजी प्रस्थान

नीरा : पुरंदर तालुक्यातील सासवड येथून आषाढी वारीसाठी जाणारा संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा यावर्षी 23 जून रोजी मार्गस्थ होणार आहे. याबाबतची माहिती सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी दिली आहे. गोसावी हे पालखी सोहळ्याच्या मार्गाचा आढावा घेण्यासाठी व मार्गावरील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. यावेळी ते नीरा गावात आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
आषाढी वारीसाठी श्रीसंत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा सासवडमधून मोठ्या भाविकांसह वारकर्यांसह जात असतो. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू असलेले संत सोपान काकांची समाधी ही सासवडमध्ये आहे. आणि सासवडमधून हजारो वारकरी दरवर्षी आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे जात असतात. या सोहळ्यातील वारकर्यांच्या सोयी सुविधा करण्यासाठी त्यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारे अडचण राहू नये यासाठी पालखी सोहळा कमिटीने या मार्गाची पाहणी केली आहे. यासाठी त्रिगुण गोसावी आणि त्यांचे सहकारी नीरा येथे आले होते.
त्रिगुण गोसावी म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पालखी सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही वारी सोहळ्यापूर्वीच मार्गाची पाहणी करत असतो. मार्गावरील येणार्या अडचणी समजून घेत असतो.आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. सध्या रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे. जमिनीचा अधिग्रहण झालेल आहे.
वारकर्यांसाठी अनेक ठिकाणच्या मुक्कामाच्या जागांमध्ये बदल झालेले आहेत. त्याच्यावरील पर्याय काढून वारकर्यांना चांगल्या पद्धतीची सोय कशी होईल ते पाहण्याकडे आमचा कल आहे. विशेष करून वाखरीमध्ये हा सोहळा चांगला कसा होईल यासाठी आम्ही चाललेलो आहोत. त्या ठिकाणी चांगली सुव्यवस्था कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.





