पुणे जिल्हा : भीमा नदीत वादळात बोट उलटून सहाजण बुडाले

कळाशी ते कुगाव दरम्यान अपघात : फौजदाराने पोहत येत जीव वाचवला
रात्र उशिरापर्यंत शोधकार्य सुरु
बिजवडी – भीमा नदीच्या पात्रात सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान वादळी वाऱ्यात लोकांना कुगाव वरून इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावी येत असताना इनामदार वाड्या नजीक वाऱ्याच्या प्रवाहाने बोट उलटली. यात सहा जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांचा शोध सुरु अहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाववरुन इंदापूर तालुक्यातील कळाशी अशी ही वाहतूक केली जात असून, यामध्ये सहा ते सात जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती आहे. घटना समजताच बचाव कार्यासाठी प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले आहेत.
यात कुगाव येथील रहिवासी असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बचावले आहेत. ते पोहोतच पाण्याबाहेर नदीकाठी आले. त्यावेळी ते गाळात अडकले असता त्यांना स्थानिक मच्छिमारांनी मदत करीत बाहेर काढण्यास मदत केली. कळाशी येथील ग्रामस्थ वेळीच मदतीला धावले.
या बोटीतून हे सर्व इंदापूर तालुक्यातील कळाशीला येत होते आणि याच दरम्यान या बोटीला अपघात झाला. ही बोट वाऱ्यामुळे पाण्यात बुडाली. या बोटीत एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुले होती अशी माहिती मिळत आहे. यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे. त्यापैकी राहुल डोंगरे पाण्याबाहेर आले आहेत. तर इतरांचे शोधकार्य रात्री उशिरापर्यंत चालू होते.





