पुणे जिल्हा: उद्या दुकानाचे उद्घाटन, आज विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

लोणी काळभोर –नवीन दुकानाचे उद्या मंगळवारी (दि.७) उद्घाटन असलेल्या तरुणाचा मृतदेह आज सोमवारी दुपारी चार वाजता कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका विहिरीत आढळून आला आहे. एकुलता एक मुलगा हरपल्याने कुंजीरवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव शशिकांत कुंजीर (वय. ३५, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मृतदेह आढळल्याचे तरुणाचे नाव आहे.
शशिकांत कुंजीर हे कुटुंबासोबत कुंजीरवाडीत राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. मुलगा गौरव कुंजीर हा शेतीतील ठिबक सिंचनची कामे करीत होता. गौरव कुंजीर हा ठिबक सिंचनचे साहित्याचे नवीन दुकान टाकणार होता. या दुकानाचे उदघाटन उद्या मंगळवारी (दि. ७) करण्यात येणार होते.
रविवारी संध्याकाळी गौरव घरातून गेला तो परत घरी आलाच नाही. त्यामुळे गौरवचे वडील व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. मात्र गौरव कोठेही आढळून आला नाही. कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर हे शेताकडे चालले होते. तेव्हा मिलिंद कुंजीर यांना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका विहिरीच्या काठावर एक चप्पल आढळून आली. त्यामुळे गौरव कुंजीर हा विहिरीत बुडाला असल्याची शंका त्यांच्या मनामध्ये आली.
त्यानंतर पोलीस पाटील कुंजीर यांनी या घटनेची माहिती तत्काळ लोणी काळभोर पोलीस व अग्निशामक दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, हवालदार विजय जाधव, दादा हजारे, सागर कदम व अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गौरवला पाण्यातून बाहेर काढले. व उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
गौरवच्या नवीन दुकानाचे उद्या मंगळवारी उद्घाटन होणार होते. या अगोदरच गौरवचा मृतदेह आज सोमवारी विहिरीत आढळला आहे. त्यामुळे कुंजीरवाडी सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा गौरव हरपल्याने कुंजीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौरव कुंजीर याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.





