Pune District : शिरूर गुणवत्तेत अग्रणी राहण्यास कटिबद्ध

नंदकुमार सागर : कोंढापुरीत सहविचार सभा
पाबळ – शिरूर तालुका शिक्षण व प्रशासनात राज्यात सदैव अग्रणी राहिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व भारतीय लोकसेवा आयोगातील स्पर्धा परीक्षेत यशस्वी अधिकारी तालुक्यात आहेत. पाचवी व आठवी शिष्यवृती परीक्षा, एनएमएमएस तसेच सारथी शिष्यवृत्ती परीक्षेतही तालुक्यात शैक्षणिक परंपरा नावलौकीकास पात्र आहे. गुणवत्ता, प्रशासन व विद्यार्थी प्रगती यासाठी शिरूर तालुक्यातील कामासाठी सदैव कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी केले.
कोंढापूरी (ता. शिरूर) येथील विद्यानिकेतन प्रशालेत शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी निवड सहविचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
सहविचार सभेस राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, डॉ. पानसरे सनी मेदगे, मुख्याध्यापक माळशिखरे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक मेमाणे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तुकाराम बेनके, माजी सचिव मारुती कदम, राज्य मुख्याध्यापक आश्रमशाळा महामंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, मुख्याध्यापक उपस्थित होते.
याप्रसंगी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड व सचिव राजेश गायकवाड यांनी निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले. राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. तुकाराम बेनके यांनी प्रास्ताविक तर रामनाथ इथापे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी आभार मानले.
मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष थिटे
शिरूर तालुका शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य रामदास थिटे तर सचिवपदी बाळासाहेब चव्हाण यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : नामदेव चौधरी (कार्याध्यक्ष), रामनाथ इथापे, प्रकाश गावडे, भाऊसाहेब वाघ, रामदास चव्हाण स्वाती थोरात (उपाध्यक्ष), अशोकराव दहिफळे, रामदास सानप, राजेंद्र घोडके (सहसचिव), विनोद शिंदे (विद्या सचिव), संजय वाघमारे, शांताराम खामकर (विद्या सहसचिव), रमेश जाधव (खजिनदार), सुनील थोरात, रामदास मगर (सहखजिनदार), अनिल साकोरे (स्वामी विवेकानंद संस्था प्रतिनिधी), रामदास टिकले (रयत संस्था प्रतिनिधी), राजेश सोनावणे (वार्तापत्र संपादक), दौंडकर (अंतर्गत हिशोब तपासणीस), विमल झावरे (महिला प्रतिनिधी), मोहन दरेकर (विना अनुदानित प्रतिनिधी) सुहास जाधव, सतीश पोटे, दिव्या जांभळकर, जिजाबाई थिटे (इंग्रजी माध्यम प्रतिनिधी), फारूक सांगलीकर (अल्पसंख्यांक प्रतिनिधी), तुकाराम बेनके, तुकाराम शिरसाट, अनिल साकोरे, राजाराम ढवळे (विश्वस्त).
तालुक्याच्या गुणवत्तेस प्राधान्य देणार
प्राचार्य रामदास थिटे म्हणाले की, विना अनुदान शाळांना त्वरित अनुदान टप्पा वितरीत करावा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांची भरती वर्षातून २ वेळा पोर्टलव्दारे करावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासननिर्णय रद्द करावा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच उच्च माध्यमिक विविध प्रवेश परीक्षांबाबत तालुका स्तरावर कार्यशाळांचे आयोजन, याबाबत सर्व तालुका पदाधिकारी यांचे सहकार्य घेत एकत्रित कामकाज करत तालुक्याच्या गुणवत्तेस प्राधान्य देणार आहोत.





