पुणे जिल्हा : जेजुरीत बुधवारी शरद पवार

मल्हार नाट्यगृह, इतर कामांचे करणार लोकार्पण : आमदार जगतापांनी केली पाहणी
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत सुमारे सहा कोटी रुपये खर्चून मल्हार नाट्यगृह उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामांची उद्घाघाटने बुधवारी (दि. 9) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडेपाटील यांनी दिली.
जेजुरी नगरपालिकेवर मागील सात वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता होती. आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून जेजुरीच्या सांस्कृतिक भवनाच्या जागेत सुमारे सहा कोटी रुपये खर्चून आधुनिक मल्हार नाट्यगृह उभारण्यात आले. या नाट्यगृहात राज्यातील ग्रामीण भागातील पहिली आर्ट गॅलरी तयार करण्यात आली आहे.
तसेच जेजुरी शहरात कोट्यवधी रुपये खर्चून दहा विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिली.
यावेळी मल्हार नाट्यगृह तसेच विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडेपाटील, उपाध्यक्ष पुष्कराज जाधव, कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, महेश दरेकर, बाळासाहेब सातभाई, हेमंत सोनवणे, जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एन. डी. जगताप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर दरेकर, संदीप जगताप, प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.





