पुणे जिल्हा : शरद पवारांकडे पुढारी कमी मात्र मतदार अधिक – प्रवीण माने

इंदापुरात पवार गटाची बैठक
इंदापूर – इंदापूर तालुक्यात शरद पवारच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीसोबत, सध्या पुढारी कमी दिसत आहेत. मात्र येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क पवारांच्या बाजूने आजपर्यंतच्या इतिहासात जेवढे मतदान झाले नाही तेवढे होईल. त्यामुळे आपण घरोघरी जाऊन शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या वतीने मते मागण्याचे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करायचे आहे.
रणनीती आखायची आहे. पत्रके द्यायची आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये निश्चितच शरद पवार आणि खासदार सुळेंच्या बाजूने इंदापूर तालुक्यातील मतदार राजाचा कल स्पष्ट दिसेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीची बैठक बुधवारी (दि.25) इंदापूर शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात पार पडली. याप्रसंगी माने बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष ऍड. तेजसिंह पाटील, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते कालिदास देवकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, दादासाहेब थोरात, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,
सुनीता भोसले, समद सय्यद, अक्षय कोकाटे, अरबाज शेख, सुधीर मखरे, श्रीकांत मखरे, अनिल ढावरे, विकास खिलारे, गफूर सय्यद, आझाद मुलाणी, बाळासाहेब चितळकर, देविदास भोंग, ऍड. मुलाणी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठराव राज्यपालांकडे पाठवणार
बैठकीत कार्यकर्त्यांची नोंदणी केली गेली. कार्यकर्त्यांच्या ग्रुप समित्या स्थापन करून महिलांना, तरुणांना तसेच समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देऊन पक्ष बळकट करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचे या बैठकीत ठरले आहे. यावेळी मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे याकरिता ठराव केला असून तो राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे ऍड. तेजसिंह पाटील यांनी सांगितले.





