Pune District : छत्रपतीच्या आखाड्यातून शरद पवार गटाची माघार

बारामती : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनलमधून डावलल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणुकीतून सपशेल माघार घेतली आहे. शरद पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी बारामती येथे पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला. कारखान्याच्या भल्यासाठी विश्वासाने आम्ही पाठिंबा दिला. मात्र, पॅनल तयार करताना प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे माघार घेत असून याबाबत खासदार सुप्रिया सुळे तसेच श्रीनिवास पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे ते त्यांनी सांगितले.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाने मात्र ना समर्थन, ना विरोध या तत्त्वाचा वापर करीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. कारखान्याची सध्याची परिस्थिती बिकट असल्याने सर्वांच्या सहकार्याने कारखाना पुन्हा उभा करण्याचा मानस राष्ट्रवादी शरद पवार गटाने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. त्यानुसार सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले. मात्र, या पॅनलमध्ये शरद पवार गटाचा एकही उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करीत शरद पवार गटाने निवडणुकीतून माघार घेतली.
प्रचारादरम्यान तटस्थ भूमिका घेणार
निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार आपण करणार नाही. तटस्थ भूमिका घेणार आहोत. कार्यकर्ते व सभासद सदसद विवेकबुद्धी जागरुक ठेवून मतदान करतील, असा विश्वास तेजसिंह पाटील यांनी व्यक्त केला. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला होता. मात्र प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने निवडणुकीतून माघार घेतली. माघारी घेण्यापेक्षा लढणे हा पर्याय असताना देखील शरद पवार गटाने माघार का घेतली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.





