पुणे जिल्हा : ‘संसदरत्न’ मायबाप जनतेला समर्पित – खासदार डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव – कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा ‘संसदरत्न’ पुरस्कार मतदार संघातील मायबाप जनतेला समर्पित करतो, असे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
शनिवारी (दि.१७) नवी दिल्ली येथे संसदरत्न पुरस्कार सोहळा पार पडला. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचे सांगितले. संसदेत बजावलेल्या कामगिरीमुळे संसदरत्न पुरस्कार मिळाला असल्याचे नमूद केले.
शिरुर मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांचा प्रश्न मार्गी लावला असून नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण, शिक्रापूर आणि पुणे शिरुर या तीनही रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. बायपास रस्त्यांची कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात दिलेल्या शब्दांची पूर्तता केली असल्याचे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.
याशिवाय तीनशे एकरावरील इंद्रायणी मेडिसिटीला मंजुरी मिळाली असून चाकणला कामगार विमा योजनेचे रुग्णालय मंजूर झाले आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. शिवनेरीच्या रोप-वेसाठी राज्य सरकार आणि नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लि. यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. वढू तुळापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. तर शिवसंस्कार सृष्टीसह इतर अनेक प्रकल्प पुढील काळात पूर्ण करायचे आहेत, असे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.





