Pune District : साकेत यादव ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

चिंबळी : ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत साकेद यादवने सतपाल सोनटक्के याचा पराभव करीत 1 लाख 50 हजार रुपयांसह चांदीची गदा पटकावली आहे.
ग्रामदैवत उत्सवानिमित्त गावातील सर्व मंदिरांना भव्य विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला होता. शुक्रवारी (दि. 18) पहाटे काकड आरती महापूजा व अभिषेक करण्यात आला तर सकाळी नऊ ते दहा मांडव डहाळे मिरवणूक काढून सकाळी दहा ते सहा भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये 200 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. या बैलगाडा शर्यत घाटाचा शुभारंभ माजी सभापती व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकास कातोरे, यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थितत करण्यात आला. तर सायंकाळी आठ वाजता पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
तर करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला होता. शनिवारी (दि. 19) सकाळी नऊ वाजता लोकनाट्य तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला तर सायंकाळी पाच ते दहा कुस्त्यांचा आखाडा पार पडला. यावेळी 100 मल्लांनी यात सहभाग घेतला होता. स्पर्धेचे पंच म्हणून पांडुरंग बनकर व दत्तात्रय गवारे यांनी काम पाहिले.





