पुणे जिल्हा : दूध उत्पादकांच्या जखमेवर चोळले मीठ

दोनच महिन्यांत 34 रुपयांचा दर हवेतच विरला
समीर भुजबळ
वाल्हे – जुलै महिन्यात शासनाने अध्यादेश काढून गायीच्या दुधास 34 रूपये दर निश्चित केला होता; मात्र दोन महिन्यातच गायीच्या दुधास खासगी दूध संघांने पुन्हा 2 रुपये दर कमी करून आगोदरच चारा-पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची संतप्त प्रतिक्रिया, दुध उत्पादका मधून येत आहे.
यावर्षी पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने तालुक्यातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात टॅंकर सुरू आहेत. अशा परिस्थितीत जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने, अनेक पशुपालक दुसऱ्या तालुक्यातून जनावरांना चारा आणून, पशुधन वाचविण्यासाठी, धडपडत आहेत. अशी परिस्थितीत असतानाच खासगी दूध संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी दरात 2 रुपये घट केल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत दुधाच्या दरात 2 रुपयांनी घसरण झाली असून त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे.
दुसरीकडे मात्र पशूखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असताना दूधाचे वाढलेले दर दुधाला चांगली मागणी असतानाही कमी होत असल्यान याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसणार आहे. दुधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हा जोड व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होता.दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतनाच दरात घट झाली आहे. दुधाचे दर आता 34 रुपये लिटरहून थेट 32 रूपयांवर दुधाचा दर आला आहे. आगोदरच मागील काही महिन्यांपासून “लम्पी’ जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे पशुपालक आधीच अडचणीत आहेत.
धोरणात्मक निर्णय चुकीचे
दरवर्षीच दसरा-दिवाळी सणांच्या आगोदर दुधाची मागणी जास्त वाढते. मात्र, हिरव्या चारा टंचाईमुळे, दुधाच्या उत्पादनात ऐन सणासुदीच्या दिवसांत दूध उत्पादान घट होते. यातच खासगी दूध संघ व शासनाच्या दूध उत्पादकांच्या चुकीच्या धोरणात्मक निर्णयामुळे ऐन पावसाळ्यात दुधाची मागणी जास्त वाढली असतानाही, बाजारभाव कमी केल्याने दूध उत्पादक शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडणार आहेत.
ओला-सुका चाराऱ्याची कमी असताना ऐन पावसाळ्यात दुधाचे दर कमी केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणार आहे. अनेक तरुण शेतकरी दूध उत्पादान व्यवसायाकडे आशेने पाहू लागले असताना खासगी दूध संघ दुधाचे बाजारभाव कमी करत आहेत; तर दुसरीकडे मात्र, पशुखाद्याचे दर मात्र, दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. दुधाचे दर कमी करायचे असतील तर आगोदर पशुखाद्याचे दर कमी करावेत.
– महादेव चव्हाण, दूध उत्पादक शेतकरी





