Pune District : शेतकरी कुटुंबातील रोहन क्लास वन

तळेगाव ढमढेरे : शेतकरी कुटुंबातील रोहन राजेंद्र पिंगळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत ५८१ वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.
रोहन याचे प्राथमिक शिक्षण तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेत झाले. वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. गुरुजनांचे मार्गदर्शन व आई-वडिलांनी दिलेली शिक्षणासाठीची संधी ओळखून रोहनने यूपीएससी परीक्षेत अभूतपूर्व यश मिळविले आहे.
रोहनचे वडील व्यवसायाने वकील असून, शेती व्यवसायावर त्यांचा खूप विश्वास आहे. रोहनची आई गृहिणी असून, शेती व्यवसायात मातब्बर आहे. रोहनची बहीण एम. फार्मसी झाली आहे. शेतकरी कुटुंबातील रोहन यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्याने कुटुंबासह नातेवाईक व ग्रामस्थांना आनंद झाला आहे.





