Pune District : टाकळीच्या गावडे स्कूलमध्ये रिंगण सोहळा

टाकळी हाजी – आषाढी एकादशीनिमित्त एस. पी. गावडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे पालखी मिरवणूक व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहाने झाला. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीची मिरवणूक काढली. मुलींनी नऊवारी साडीच्या वेशात डोक्यावर तुळस गळ्यात टाळ, मृदंग, तुळशीच्या माळा घालून विठ्ठल भजनात रिंगण सोहळा काढण्यात आला. सर्व मुले ही विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाली होती. अभंग, ओव्या, फुगड्या खेळत विद्यार्थ्यांनी तसेच पालक व शिक्षकांनी देखील सोहळ्यात सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी फेरीचे नियोजन करत अभंग व टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीचे विधिवत पूजन करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्याचे प्रशालेच्या प्राचार्या नीता खामकर यांनी सांगितले.
दिंडी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याने संस्थेचे अध्यक्ष सुनिता गावडे व पालकांनी कौतुक केले. यावेळी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला. सोहळ्याचे नियोजन प्राचार्या नीता खामकर, वंदना गाडेकर, सायली काळे, दीप्ती गाडीलकर, सृष्टी चौगुले, अंकिता घोडे, मनीषा भाकरे यांनी केले.





