मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल ५६,००० फॉर्म भरले. शिरूर : शिरूर तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यात दि. १ ऑगस्ट २०२४ पासून महसूल पंधरवडा राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, पुणे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार १ ऑगस्ट २०२४ रोजी तहसील कार्यालय शिरूर येथे महसूल दिनानिमित्त महसूल पंधरवडा कार्यक्रमाचा शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीमध्ये दैनदिन शिबिर व महसुल पंधरावडयामध्ये महसुल सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात एकुण मिळून तब्बल ५६, ००० फॉर्म भरण्यात आले. ही योजना राबवण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यक्रमाचा शुभारंभ करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाभार्थी महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच उपस्थित असणाऱ्या महसूल पंधरवडा कार्यक्रमाची दिवस निहाय राबवण्याच्या योजनांची माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास शिरूर नायब तहसीलदार प्रकाश मुसळे, सुवर्णा खरमाटे, सुजाता बारहाते ,स्नेहा गिरीगोसावी, प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे ,प्रकल्प अधिकारी सटाले मॅडम, लाडकी बहीण योजनेचे समन्वयक निलेश घोडके , मंडल अधिकारी नंदू खरात, शरद सानप , तलाठी पांडूरंग कोळगे,अंकुश सुपे ,पांडूरंग कोळगे, सामाजिक कार्यकर्ते शरद उघडे, अंगणवाडी सेविका, लाभार्थी महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच शिरूर तहसील अंतर्गत एकूण दहा मंडळांमध्ये मंडळ स्तरावरून सदर कार्यक्रमाचे प्रभावीपणे आयोजन केले असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद सानप यांनी केले.