पुणे जिल्हा : पुरंदवासीयांनी मिळणार अखंडीत वीजपुरवठा

आमदार जगताप : कामांसाठी 178 कोटी 37 लाख 90 हजारांचा निधी
सासवड – पुरंदर तालुक्यातील नागरिकांना अखंडीत वीजपुरवठा मिळण्यासाठी वीजपुरवठा सुरू करणार्या वाहिनींचे विभाजन करणे तसेच त्यांची कार्यक्षमता आणि सार्थकता वाढविण्यासाठी शासनाकडून नवीन वीज उपकेंद्र उभारणे, नवीन एलटी लाइन उभारणे, नवीन रोहित्र बसविणे, सद्यस्थितीतील रोहित्रांची क्षमता वाढविणे, नवीन फिडर, नवीन एबी स्विच तसेच इतर दुरुस्तीच्या कामांसाठी 178 कोटी 37 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.
सासवड येथे आमदार जगताप यांनी मंगळवारी (दि. 5) पत्रकार परिषद घेत वरील माहिती दिली. बुधवारी (दि. 6) बेलसर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 33 केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात आमदार संजय जगताप यांनी केलेल्या उपोषणाची उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत सर्व अडचणी सोडविण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार पुरंदर हवेलीमध्ये ‘एक गाव एक दिवस योजना’ सुरू करून कामे होत आहे.
दिवे येथील उपकेंद्राचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यातील वाढते नागरीकरण, आंतरराष्ट्रीय विमानतळ, कारखानदारी, पुरंदर उपसा, जनाई उपसा व होणार्या गुंजवणी योजनेचे पाणी यासाठी लागणार्या अधिकच्या विजेचा तुटवडा भासणार नाही. यासाठी पुढील दोन वर्षांत ही सर्व कामे पूर्ण होणार असून यामुळे तालुक्यातील सर्व गावांना अखंड वीजपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
… तर शेतीसाठी दिवसा वीज
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यासाठी तालुक्यातील कोळविहीरे, कोथळे, नाझरे सुपे, पिसर्वे, राजुरी, जेऊर, वाल्हे, थोपटेवाडी, वाळुंज, खानवडी, कोडीत बुद्रुक या 11 ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी 146 एकर जमीन उपलब्ध केली आहे. शेतकर्यांनाही आपल्या पडीक जमीनी महावितरणला भाडेतत्त्वावर देऊन यायोजनेचा लाभ घेता येईल. यामुळे येथील ऊर्जेचा उपयोग करून शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.





