Pune District: बारामतीची रेश्मा करणार देशाचे नेतृत्व

बारामती : बारामती तालुक्यातील तरडोली या जिरायती पट्ट्यात सर्वसामान्य कुटुंबातील रेश्मा पुणेकर याची पंजाब राज्यातील सगलूर या ठिकाणी झालेल्या निवड चाचणीमध्ये पुन्हा एकदा भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे रेश्माने सिद्ध केले. आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात रेश्माने संघाचे नेतृत्व केले आहे. सलग चौथ्यांदा भारतीय महिला संघात निवड होणारी महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे.
रेश्मा पुणेकर हिला सुरुवातीपासूनच आर्थिक परिस्थितीचे चटके सहन करत क्रीडा क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे लागले आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे परिसरामधील तरुण मुले- मुली त्यांच्याकडे एक प्रेरणास्त्रोत म्हणून पाहत आहेत. रेश्मा हिने अनेक सुवर्ण, कांस्य, रौप्य पदकांची कमाई केली आहे.
महाराष्ट्र शासनाचा खेळ क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्यांनी प्राप्त केला आहे. बँकॉक, थायलंड देशांमध्ये दि. 21 मे ते 30 मे या कालावधीमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी रेश्मा दि. 20 मे रोजी दिल्ली या ठिकाणाहून रवाना होणार आहे. सध्या दि. 1 मे ते 20 मेपर्यंत रेश्मा पंजाब राज्याती सगरूर या ठिकाणी सराव शिबिरामध्ये भारतीय संघासह सराव करणार आहे.





