Pune District : अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; नराधमास जन्मठेप

राजगुरूनगर : खेड पोलीस स्टेशन हद्दीतील राजगुरूनगर शहराजवळ असलेल्या गावातील एका 14 वर्षीय लहान निर्भयावर बलात्कार करणार्या चुलत्यास येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी गुरुवारी (दि 12) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याची माहिती अशी, खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजगुरूनगर जवळील एका गावातील 14 वर्षीय निर्भया आई वडील शेतात कामाला गेल्यानंतर ती घरी एकटी होती. घरी एकटी असताना नात्याने चुलत चुलता असलेल्या नराधमाने मे 2017 ते मे 2018 या कालावधीत निर्भयाच्या घरी जाऊन तिला धमकी देत तिच्यावर वर्षभरात अनेकदा बलात्कार केले. निर्भया आणि तिच्या कुटूंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने अनेकदा हे कृत्य करीत होता.
त्यातून 14 वर्षीय निर्भया गर्भवती राहिल्यानंतर ही बाब उघड झाली होती. 1 जून 2018 साली पीडित 14 वर्षीय निर्भयाने खेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार नात्याने चुलत चुलता असलेल्या नराधमावर खेड पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, प्रदीप जाधव यांनी करून आरोपीला अटक केले होते. तेव्हापासून हा नराधम येरवडा कारागृहात आहे.
14 साक्षीदार तपासले
हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश पोळ यांच्या पुढे सुरू होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी 14 साक्षीदार तपासले. तर आरोपीच्या वकिलांनी 3 साक्षीदारांची साक्ष घेतली. या गुन्ह्यात आरोपीची डीएनए चाचणी झाली होती. त्यात आरोपी हा बाळाचा बाप असल्याचे निष्पन्न झाले होते. निर्भया, तिची आई, डीएनए चाचणी करणारे डॉक्टर, तपास पोलीस अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण झाली. या खटल्यात आरोपी नराधमास दोषी ठरवण्यात आले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार आर. एस. जाधव यांनी काम पहिले.





