Pune District : भुईमुग काढणीला पावसाचा अडथळा; शेतकर्यांची धांदल

चिंबळी –खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राशी निगडित ग्रामीण भागात शेतकरीवर्गाने यंदा खरीप हंगामात सोयाबीनबरोबर भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. योग्यवेळी खतपाणी, खुरपणी करून पिकाची काटेकोर निगा राखल्याने भुईमूग पिक हिरवेगार दाटून आले.
काही दिवसांपूर्वी पिक काढणीस सज्ज झाले असताना, शेतकर्यांचा आनंद दुणावला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकर्यांची काढणीची कामे विस्कळीत झाली आहेत.
आधीच काढणी सुरू केलेल्या शेतकर्यांना ओल्या हवामानामुळे अडचणींना सामोरे जावे लागत असून पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकर्यांनी सांगितले की, मोठ्या खर्चाने खत-पाणी घालून मेहनतीने भुईमुग तयार केले.
आता काढणीच्या वेळी पावसाने धांदल उडवली. पिक सडले तर आमचे मोठे नुकसान होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. कुरूळी परिसरात शेतकरी काढणीसाठी शेतात धाव घेत असलेले दृश्य पाहावयास मिळत असून, पावसाच्या लहरीवर यंदाच्या भुईमुग कापणीचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे.





