Pune District : शिवसंस्कृतीची रेल्वे सफर

जुन्नर : भारतीय रेल्वेद्वारे शिवप्रेरणास्थळे जोडण्याच्या योजनेमधील छत्रपती शिवाजी महाराज सर्कीटमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा 10 जून रोजी पुण्यात येणार असून 11 जून रोजी किल्ले शिवनेरी आणि भीमाशंकर या प्रेरणास्थळी येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी ही विशेष पर्यटक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची घोषणा केली असून ती 9 जूनला धावणार आहे. पाच दिवसांच्या या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत.
या सहली दरम्यान महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना याची देही, याची डोळा अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शासन यांच्यावतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस असल्याचे पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.
यात्रेच्या दरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी भारतीय रेल्वेच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर पर्यटकांना मार्गदर्शन करतील असे ते म्हणाले. या विशेष ट्रेनच्या संपूर्ण उपक्रमाचा पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी समन्वय केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाच्या या सहलीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. या उत्साही यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा उचलावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे, असे आवाहन पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
रेल्वेने भारत गौरव ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज सर्कीटमध्ये शिवनेरीचा आणि भीमाशंकरचा समावेश केल्याबद्दल आम्ही केंद्र व राज्य सरकारचे आभारी आहोत. पुण्यातून शिवनेरी व भीमाशंकर दर्शनासाठी पर्यटकांना आणण्यासाठी ई शिवाई बससेवा उपलब्ध करावी, अशी आग्रही मागणी आहे.
-राहूल जोशी, अध्यक्ष, सह्याद्री गिरीभ्रमण संस्था, जुन्नर





