तरडोलीत शेतकरी आक्रमक : दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रतिमेला ‘जोडेमारो’ मोरगाव – तरडोली (ता. बारामती) येथे दूध दरवाढीबाबत सुरू असलेल्या उपोषणाचा शुक्रवारी (दि. 6) सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुणे-बारामती रस्ता तरडोली येथे 1 तास अडविला होता. यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रतीमेला जोडे मारुन रस्त्यावर दूध ओतून शासनाविषयी तिव्र संताप व्यक्त केला. राज्यातील शेतकऱ्यांना दूध दर वाढ मिळावी यांसह अनेक मागण्यांसाठी बारामती तालुक्यातील तरडोली येथील सागर जाधव रविवार (दि. 1) पासून उपोषण सुरू केले होते. या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोरगाव-बारामती रस्ता रोको करण्यात आला होता. या आंदोलनासाठी तरडोली, मोरगाव, मुर्टी, बाबुर्डीसह पुरंदर व इंदापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कदम म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला शासनच जबाबदार आहे. सध्याच सरकार असो वा यापूर्वीचे सरकार असो हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्यानेच शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे. सध्याचे सरकार मंदिर, देवतांमध्येच नांदवतेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावभेट दौऱ्या दरम्यान मंदिरासाठी 15 लाख रुपये घोषित केले; मात्र शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचनचे पाणी मिळण्यासाठी एक पैसा ही दिला नाही. इंग्रजांच्या नितीप्रमाणे सध्याचे सरकार मंदिर व देव देवतांमध्ये नांदवत असून मुख्य मागणी पासून दूर ठेऊ पाहत असल्याचा घणाघात शेतकरी विजय भोसले यांनी केला.