पुणे जिल्हा : शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात

अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी गाड्या
निमोणे – सध्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सने हे प्रकरण उचलून धरल्यावर मात्र त्या मुलासह त्याच्या वडिलांवर कडक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी गाड्या दिल्या जात आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात आहे. यावर पोलिसांनी अंकुश ठेवण्याची मागणी पालक, नागरिकांमधून होत आहे.
शिरुर तालुक्यातही अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात सध्या दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या देत असल्याचे चित्र असुन ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांच्या हातात ट्रॅक्टर, मालवाहू चारचाकी गाड्या सर्रास दिसत असुन हि अल्पवयीन मुले वेगात गाड्या पळवत आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्यासारखा गंभीर अपघात होण्याची शक्यता ग्रामीण भागातही नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनीही अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देताना काळजी घेणे गरजेचे आहे.
चौकट
शिरूर तालुका हा औद्योगिक, नागरिकीकरणामुळे विस्तारला आहे. एमआयडीसीमुळे शिक्रापूर, रांजणगाव गणपती, सणसवाडी आदी भागात आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे भौतिक सुविधांमागे धावणारा हा घटक तोलामोलाचा झाला आहे. त्यातून चंगळवादी प्रवृत्ती फोफावली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला हा विशीतील तरूण वाहन बेफाम चालवित आहे. त्यातून पुण्यातील पोर्शे पॅटर्नची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत आहे.
शेतासाठी वाहन चालक अल्पवयीन
सध्या निमोणे, शिंदोडी, गुनाट परिसरात घोड धरणातील काळी माती आणून शेतात टाकत असून या माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर असणारे काही चालक अल्पवयीन आहेत. काही ट्रॅक्टर चालकांकडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना नाही. तसेच हे चालक मोठया मोठया आवाजात गाणी लाऊन वेगात ट्रॅक्टर चालवत असतात. त्यामुळे भविष्यात जर पुण्यासारखी घटना झालीच तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
वाहनांची कागदपत्र तपासणी गरजेची
जेसीबी आणि ट्रॅक्टर वापरले जातात. त्यांचा इन्शुरन्स आहे का? तसेच जेसीबीचा चालक आणि ट्रॅक्टर चालकाकडे रीतसर वाहने चालविण्याचा परवाना आहे का ? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.





