Pune District : शिवगंगा नदीवरील पुलाची दूरवस्था; – पूल वाहून जाण्याची भीती; वाहनचालकांना भरतेय धडकी

खेड शिवापूर : हवेली, भोर व राजगड या तीन तालुक्यांना जोडणारा शिवगंगा नदीवरील पुलाची दूरवस्था झाली असून सदर पूल कधी वाहून जाईल, याची शाश्वती नाही. पुलाची अवस्था पाहून पुलावरून वाहन चालवताना चालकांना धडकी भरत आहे.
या पुलाच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी भोरचे आमदार शंकर मांडेकर यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे पुलाच्या दयनीय अवस्था, सांगायची कोणाला, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवगंगा नदीवरील पुलाची डागडुजी केलेली नाही. १९७४ साली उभारलेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाय योजना केली नाही.
त्यामुळे पावसाचे पाणी पुलावर साचून वाहन चालकांना पुलावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरवर्षी पुलाची अवस्था दयनीय होत असून भविष्यात पूल कोसळला तर कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लवकरच काम सुरू होईल…
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रकाश गाडे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, जुलैमधील पुरवणी अर्थसंकल्पात त्याची शिफारस करून घेणार आहोत. त्यानंतर आमदारांनी मान्यता दिली की लगेच पुलाचे काम सुरू करण्यात येईल.





