Pune District : इंद्रायणीतील प्रदुषित पाण्याचा पिकांना फटका

चिंबळी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाण्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा रंग काळपट व हिरवेगार झाला आहे. मोशी-चिंबळी हद्दीतील इंद्रायणी नदीच्या काठावर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यात दुर्गंधी युक्त हिमनगाचा फेस निर्माण झाला असून या पाण्याचा शेतीवर गंभीर परिणाम झाला आहे.
जलपर्णींच्या वाढीने नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी पिकांसाठी दूषित पाणी वापरण्याचे टाळत आहेत. यापाण्यामुळे पिकांवर गंभीर परिणाम होऊन शेतकर्यांच्या उत्पन्नात घट झाली असल्याचे काही शेतकर्यांचे म्हणणे आहे. नदीपात्रातील पाणी विहिरी आणि बोअरवेलमध्ये उतर असल्याने पिकांना त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. या प्रषूषित पाण्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्हीही प्रभावित झाली आहे. परिणामी, शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
इंद्रायणी नदीचे प्रदूषण आणि शेतकर्यांची अडचण सध्याच्या परिस्थितीत एक गंभीर सामाजिक व पर्यावरणीय समस्या बनली आहे. प्रशासन आणि सरकारकडून त्वरित, प्रभावी आणि स्थायी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. जर अशी पावले उचलली गेली नाहीत, तर याचे परिणाम केवळ शेतकर्यांपर्यंतच मर्यादित राहणार नाही, तर त्याचे दुरगामी परिणाम मानवाला भोगावे लागणार आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सरकारची निष्क्रियता
या समस्येवर प्रशासनाची उदासीनता आणि सरकारच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. नदीच्या प्रदूषणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जलपर्णींच्या नियंत्रणासाठी सुस्पष्ट योजना आणि त्यासाठी लागणार्या संसाधनांचा वापर प्रशासनाने करण्याची वेळ आता आली आहे. यावर सरकारने त्वरित लक्ष घालून नदीच्या स्वच्छतेसाठी योग्य पावले उचलावी, अशी स्थानिक शेतकर्यांसह नागरिकांची एकमुखी मागणी आहे.





