Pune District : सणसवाडी- कोरेगाव भीमा गटात राजकीय वारे

इच्छुकांच्या आखाडपार्टीने चर्चा : झेडपीच्या गट रचनेनंतर हवा तापली
लक्ष्मण गव्हाणे
कोरेगाव भीमा – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या सणसवाडी- कोरेगाव भीमा जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आखाड पार्टीचे नियोजन केल्याने इच्छुकांसह या गटाची जिल्हाभर चर्चा रंगली आहे. गट- गण पुनर्रचनेनंतर राजकीय वारे वाहू लागली असून हवा तापली आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने अनेक दिवस इच्छुकांनी खर्चाला हात आखडता घेतला असला तरी आता मात्र सध्यातरी पक्ष श्रेष्ठींना खुश करीत अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी आखाडाच्या रूपाने चालत आलेल्या संधीचे इच्छूक सोने करण्यासाठी धडपड करीत आहे. त्यांच्याकडून वातावरणनिर्मिती, उमेदवारी ते निकालापर्यंतची रणनिती आखली जात आहे.
नव्याने तयार झालेल्या सणसवाडी- कोरेगाव भीमा जिल्हा परिषद गटात भाजपकडून शिरूर तालुका भाजप अध्यक्ष जयेश शिंदे, डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका हरगुडे, श्रीक्षेत्र वढूचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधून सणसवाडीचे माजी सरपंच, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे हे इच्छुक आहेत.
भाजपचे जयेश शिंदे ॲक्टिव्ह
शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या सणसवाडी- कोरेगाव भीमा जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे. या गटामध्ये भाजपामधून इच्छुक असलेल्या जयेश शिंदे यांनी पहिल्यापासून रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीर, शेतकऱ्यांसाठी शेतीपयोगी साहित्य वाटप, अपंगासाठी साहित्य वाटप, तलाठी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत नागरिकांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करीत आहेत. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने जयेश शिंदे यांचे पक्षश्रेष्ठी आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यासोबत थेट संपर्क असल्याने नागरिकांमध्ये जयेश शिंदे यांचे नाव चर्चेत आहे.
मोनिका हरगुडे यांना दांडगा अनुभव
दुसरीकडे याच जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीची निवडणूक लढवत सभापती झालेल्या मोनिका हरगुडे यांनी मागील पाच वर्षात आपल्या गणामध्ये कोट्यवधींची विकासकामे आणली आहेत. गणातील नागरिकांच्या सुख- दुःखात कायम हजेरी लावत महिला वर्गासह स्थानिक मतदारांच्या मनात आपल्याबद्दलची आपुलकी टिकवून ठेवली आहे. मोनिका हरगुडे यांनी यापूर्वी शिरूर पंचायत समितीचे उपसभापती, सभापती पदाचा कार्यकाळ पूर्ण केला असल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे या गटात त्यांचे नाव मतदारापर्यंत पोहोचले आहे.
राहुल गव्हाणे हे समाजसेवेतून लोकांशी कनेक्ट
प्रतिष्ठतेच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीस भाजपाकडून डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे हे देखील इच्छूक आहेत. २०१२ मध्ये पंचायत समितीसाठी तीव्र इच्छुक असलेल्या राहुल गव्हाणे यांनी निवडणुकीत माघार घेत आपल्या सहकाऱ्यांना संधी दिली होती तद्नंतर आजतागायत तालुक्याच्या राजकारणात सर्वांना सोबत घेत समाजसेवा करणारा निर्मळ मनाचा नेता म्हणून राहुल गव्हाणे यांची ओळख आहे. मतदारसंघात असलेला नातेवाईकांचा मोठा गोतावळा, तालुक्याच्या राजकारणात डिंग्रजवाडी गावची असलेली एकी यामुळेच मनमिळावू स्वभावाच्या राहुल गव्हाणे यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.
प्रफुल्ल शिवलेंची तरूणाईवर कमांड
दुसरीकडे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वढू गावचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे करोना सेंटर सुरु करून तालुक्यातून वाहवा मिळवली होती. तरुण सहकाऱ्यांवर असणारी पकड, कार्यकर्त्यांना आपलंस करण्याची हातोटी या गुणांमुळे प्रफुल्ल शिवले यांचे नाव देखील चर्चेत आहे. एकंदरीत हे सर्व इच्छुक तयारीला लागले असले तरी पक्षश्रेष्ठी आपली मर्जी कोणावर ठेवतात, याकडे लक्ष लागले आहे.
गावापासून ते तालुक्यात हरगुडेंचा दबदबा
जास्तीची मतदारसंख्या असलेले गाव आणि शरद पवार गटाचे खंदे नेतृत्व म्हणूनच दत्तात्रय हरगुडे यांचे नाव चर्चेत आहे. हरगुडे हे देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना आदर्श मानत राज्यातील सत्ता बदलात माजी आमदार अशोक पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले होते. माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात करीत २० वर्षे सणसवाडीसारख्या मोठ्या गावाचे प्रतिनिधित्व करून उपसरपंच, सरपंच अशी पदे भूषवली आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या माध्यमातून मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोबत घेणारे नेतृत्व म्हणून दत्तात्रय हरगुडे यांची ओळख आहे.





