स्टेटस ठेवत पोलीस अधिकारी गायब, पत्नीची तक्रार अन् साहेबांनाच शोधण्याची पोलिसांवर वेळ

वाघोली । लोणीकंद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील एक अधिकारी हरवल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दि. २६ रोजी रात्री ११ च्या सुमारास पोलीस ठाण्यात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुन्हे शोध पथकातील अधिकारी शोधण्याची वेळ लोणीकंद पोलिसांवर आली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्यातील शोध पथकातील अधिकाऱ्याने दि. 26 रोजी तीन वाजून अकरा मिनिटांनी पुढील काही काळासाठी मला कोणीही कॉल अथवा मेसेज करू नये असे स्टेटस ठेवले होते.
त्यांनतर हा अधिकारी हरवल्याची चर्चा लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाऱ्यासारखी पसरली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हरवलेल्या कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची देखील चर्चा पोलिसात मोठ्या प्रमाणात आहे.
तातडीने गुन्ह्यांची उकल करण्यात निष्णात असणारा हा अधिकारी हरवला असल्याने गुन्हे शोध पथकातील एक अधिकारी शोधण्याची वेळ पथकावर आली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.
– संदीप सातव, जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा पुणे
गुन्हे शोध पथकातील कर्मचारी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल असून संबंधित कर्मचारी शोधण्यासाठी तपास कार्य सुरू आहे.
– सावळाराम साळगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक





