Pune District : पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे, कोयते, एअरगन हस्तगत

येडगावत दोन जणांवर नारायणगाव पोलिसांची कारवाई
नारायणगाव – येडगाव (ता. जुन्नर) परीसरात एक एअरगन, एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते आणि मोटारसायकलच्या चैनस्पाॅकेटच्या व लोखंडी सळईच्या सहायाने बनवलेले हत्यार व स्वीफ्ट गाडी असा एकूण पाच लाख २७ हजार शंभर रुपये किंमतीचा मुद्येमाल नारायणगाव पोलिसांनी जप्त करून दोन जणावर गुन्हा दाखल केला आहे, अशी महिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
सार्थक जयसिंग नेहरकर व राजू अजितसिंग रजपूत (दोन्ही रा.येडगाव ) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांनी दिलेल्या माहिती नुसार, येडगाव येथील सार्थक नेहरकर याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती दिनांक ८ जुलै रोजी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक जगदेवप्पा पाटील, हवालदार लोखंडे, गोविंद केंद्रे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, रघतवान, गेंगजे, जाधव, चौगुले यांची टिम तयार करून सार्थकचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले
व त्याचेकडे चौकशी केली असता त्याने राजू रजपूत याची स्वीफ्ट गाडी क्र. एमएच १४ डीए ४७६६ मध्ये एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, एक एअरगन, दोन कोयते व मोटारसायकलच्या चैनस्पाॅकेटच्या व लोखंडी सळईच्या सहायाने बनवलेले हत्यार असे सांगितल्याने पाटील व त्यांच्या टीमने राजू रजपूत त्याला गाडीसह ताब्यात घेऊन पाहणी केली.
त्या स्विफ्ट गाडीमध्ये एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, एक एअरगन, दोन कोयते व मोटारसायकलच्या चैनस्पाॅकेटच्या व लोखंडी सळईच्या सहायाने बनवलेले हत्यार सापडले. या आरोपींना जुन्नर न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.





