Pune District : मंचर आगाराच्या कारभाराचा प्रवाशांना मनस्ताप

मंचर – मंचर एसटी आगाराने ऐन शाळा, विद्यालये सुरू होण्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. 16) तालुक्यातील तीन मुक्कामी एसटी बस व लांब पल्ल्याच्या दोन बस बंद ठेवल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.वारंवार मागणी करूनही मंचर एसटी बस आगाराच्या नियोजनात सुधारणा होत नसल्याने आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
मंचर एसटी आगाराने शाळा, विद्यालय सुरू होण्याच्या दिवशीच तालुक्यातील मंचर गंगापूर मुक्कामी, मंचर जांभोरी मुक्काम, पुणे पाटण मुक्काम या बस बंद ठेवल्याने येथील प्रवासी व नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुक्कामी बसच बंद असल्याने याचा फटका आदिवासी भागातील 35 गावांना बसला असून आदिवासी भागातून घोडेगाव, मंचर, तळेघर या ठिकाणी येणार्या, जाणार्या प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला आहे.
खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट होत आहे. तसेच लांब पल्ल्याच्या असणार्या मंचर संभाजीनगर व मंचर अक्कलकोट हि एसटी सेवा देखील मंगळवारी (दि. 17) बंद ठेवणार असल्याने 23 तारखेला लांबच्या प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागला आहे. मंचर आगार झाल्यानंतर तालुक्यातील गावागावात एसटी बस सुविधा उपलब्ध होऊन प्रवाशांच्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा होती; मात्र एसटी आगार म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.
मंचर आगाराने तीन एसटी गाड्या स्क्रॅप मध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाड्यांची संख्या जेमतेम 22 राहिली आहे. अजूनही नवीन अध्यायवत एसटी गाड्या उपलब्ध कराव्यात. अशी मागणी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश येवले यांनी केली आहे.





