Pune District : श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे उद्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन

मंचर : श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे शनिवार, दि.१ फेब्रुवारी रोजी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार आहे. तर २ फेब्रुवारीला बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री स्वयंभू मोरया देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १ रोजी पहाटे पूजा, अभिषेक व आरती होणार आहे सकाळी नऊ वाजता हारतुरे व मांडव डहाळे मिरवणूक काढण्यात येणार आहे.
अग्रभागी लेझीम पथक असणार आहे सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे देवजन्माचे कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे दुपारी भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर ढोल झांज पथक व बाल वारकऱ्यांच्या साथीमध्ये श्रींच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे.
सायंकाळी सात वाजता महाआरती व त्यानंतर स्वर मल्हार हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी निमंत्रित बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहेत. त्यासाठी १ लाख ९० हजार रुपये रोख, चार मोटरसायकल, दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन फ्रिज, दोन टीव्ही, असे बक्षीस विजेत्या बैलगाडा मालकांना दिले जाणार आहे.





